नागपूर : पुढारी वृत्तसेवा
महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांद्वारे महिलांसाठी संचालित पिंक ई-रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज (रविवार) केले. 11 पात्र महिलांना चावी वितरणानंतर एका लाभार्थी महिलेच्या पिंक ई-रिक्षातून प्रवास करत त्यांनी महिलांना कृतिशील विश्वासही दिला.
नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार संदीप जोशी आणि डॉ. आशिष देशमुख, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच महिलांना या महिलांच्या ऑटो रिक्षामध्ये बसून सुरक्षित प्रवास करण्याची हमीही या योजनेने दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील 50 पात्र लाभार्थी महिलांना ई-रिक्षा आज वितरित झाल्या असून जिल्ह्यात 2 हजार महिलांना या योजनेअंतर्गत ई-रिक्षा वितरीत होणार आहेत.
नागपूर शहरातील विविध मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना फिडरसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि महामेट्रो दरम्यान करार झाला आहे. यातून पिंक ई-रिक्षाधारक महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या पर्यटन विभागासह अन्य विभागासोबत भविष्यात असे करार करून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यावेळी म्हणाल्या, राज्यातील आठ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात येत्या सहा महिन्यात पाच हजार रिक्षा वितरीत करण्याचे उद्दिष्ट आहे. महिलांना दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाच वर्षांचा रिक्षाचा मेंटेनन्स आणि चार्जिंगची व्यवस्था ही करून देण्यात आली आहे. महामेट्रो सोबत करार करून फिडर सेवेअंतर्गत या महिलांच्या ई-रिक्षाची सेवा उपलब्ध होऊन त्यांना रोजगारही मिळणार आहे. येत्या काळात विमानतळ, पर्यटन स्थळ अशा ठिकाणीही पिंक ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरातील सन्याल नगर, टेका नाका नारीरोड येथील पूजा नरेंद्र वानखेडे यांच्या पिंक ई रिक्षातून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह प्रवास केला. या पिंक ई रिक्षाचे पहिले प्रवासी होण्याचा मान मिळवत त्यांनी महिलांना विश्वास दिला. जिल्ह्यात 20 ते 50 वर्षे वयोगटातील इच्छुक महिलांचे 2040 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने 1032 लाभार्थ्यांना मंजुरी दिली.