नागपूर : शिक्षक भरती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या एसआयटीची व्याप्ती संपूर्ण राज्यभर असेल. वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे.
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार हे या एसआयटीचे प्रमुख असतील. तसेच, पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयाचे सहसंचालक हारून आतार यांची या समितीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या अधीन असलेल्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची तपासणी एसआयटी करणार आहे.
या एसआयटीला तपासासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. २०१२ पासून आजपर्यंत झालेल्या सर्व नियुक्त्यांची तपासणी हे पथक करणार आहे.