नागपूर - शिक्षण विभागातील कोट्यवधींच्या बनावट शालार्थ आयडी, बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात गोंदिया येथून आणखी एका आरोपीस अटक करण्यात आली. राजू मेश्राम असे त्याचे नाव असून तो एका संस्थेत सचिव आहे. आता या घोटाळ्यात अटकेतील आरोपींची संख्या 7 झाली आहे. यापूर्वी बोगस कागदपत्रे तयार करून देण्यात महत्वाची भूमिका असलेल्या महेंद्र भाऊराव म्हैसकर वय 43 यास अटक झाली.
महेंद्र आणि राजू हे निकटवर्तीय असल्याचे समजते. महेंद्र गोंदियात शिक्षक आहे. न्यायालयाने सुरुवातीला तीन दिवसांची 21 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आज सोमवारी यात पुन्हा दोन दिवसांची वाढ झाली. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांची एकीकडे सायबर पोलिस कसून चौकशी करीत असताना आरोप प्रत्यारोपानी राजकारण तापले आहे. या प्रकरणाची व्याप्ती रोज वाढत आहे. 2014 ते 2024 या कालावधीत 35 ते 40 लाख रुपये प्रत्येक शिक्षकाकडून घेत बनावट कागदपत्रे, सोमेश्वर नैताम नामक सेवानिवृत्त आणि हयात नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरींचा नियुक्ती पत्रासाठी झालेला वापर लक्षात घेता आता सुमारे 580 शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींवर टांगती तलवार आहे. राज्य सरकार, शिक्षण विभागाने सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. मात्र, खरोखरीच या घोटाळ्याचा सखोल तपास , कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.