Teacher Recruitment Scam Nagpur Yavatmal SIT Raid
नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्ती प्रकरणात एसआयटीने शिक्षण उपसंचालक चिंतामण गुलाबराव वंजारी यांना अटक केल्यानंतर आता त्यांच्या दोन घरी झाडाझडती घेण्यात आली. यात नागपुरातील सुर्वे नगर व यवतमाळ येथील घराचा समावेश आहे. रविवारी ही कारवाई सुरू झाली असून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.
वंजारी यांना गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एसआयटीने बुधवारी लक्ष्मण उपासराव मंघाम, माजी उपसंचालक अनिल पारधी यांना अटक केली. त्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथील शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली. पारधी यांची जामिनावर सुटका केली. तर वंजारी, जामदार व मंगाम सध्या एसआयटीच्या पोलिस कोठडीत आहेत. लवकरच जामदार यांच्या घराची देखील झाडाझडती घेतली जाणार असल्याचे तसेच या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार इतरही काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.