नागपूर - राज्याच्या राजकारणात आता लवकरच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील का ? या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीतला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू, त्यामुळे मी सध्या एवढेच सांगू शकतो की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच जो काही निर्णय होईल, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल.
माझ्याशी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चर्चा करून गेले. त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती काय आहे, कोणते पर्याय आहेत, याबाबत त्यांनी चर्चा केली आहे. मात्र अंतिम निर्णय त्यांचा पक्षच घेईल. शपथविधी बाबत बोलताना त्या संदर्भात यापेक्षा अधिक माझ्याकडे माहिती नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्प प्रक्रियेत लक्ष घालणार
अर्थसंकल्प कोण मांडणार याविषयी छेडले असता,गेल्या काही काळात अजितदादांनी अर्थसंकल्पाची मोठी तयारी केली होती. उद्यापासून मी स्वतः अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेवर लक्ष घालून उर्वरित काम पूर्ण करणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्प कोण मांडणार, याबाबत निर्णय घेतला जाईल.
महापौर पदाबाबत गडकरी यांच्याशी चर्चा
आज मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी महापौर निवडीबाबत चर्चा केली गडकरी हे आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आहेत, त्यामुळे आता ज्या काही महापौर पदाच्या निवडणुका आहेत, त्या संदर्भात त्यांच्याशी आज चर्चा झाली. या चर्चेत महापौर पदासंदर्भात रुपरेषा ठरवण्यात आली. जी काही नावे आहेत, त्या नावांच्या संदर्भात निर्णय उद्या किंवा परवा घेतले जातील. जी रूपरेषा ठरली आहे, त्यानुसारच ही नावे अंतिम होतील. आमचे महानगराध्यक्ष, आमदार आणि संबंधित पदाधिकारी यांना याबाबत सांगण्यात आले आहे.
दरम्यान,चंद्रपूर महापौर संदर्भात बोलताना, ज्या ज्या ठिकाणी महापौरांची निवड करायची त्या त्या ठिकाणच्या प्रमुखांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी आवश्यक ती कारवाई करायची आहे.