नागपूर: राज्याच्या राजकारणातील मोठ्या उलथापालथीनंतर आता नागपूरमधील शासकीय निवासस्थानांवरही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी आता नागपूर येथील 'विजयगड' या शासकीय बंगल्यावर झळकली आहे.
उपराजधानी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसाठी 'रामगिरी' आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी 'देवगिरी' हे बंगले राखीव असतात. मात्र, राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदे निर्माण झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने 'विजयगड' हा नवा बंगला तयार केला होता. या बंगल्याशी अजित पवार यांचे विशेष नाते होते. या बंगल्यातील फुलझाडे, लॉन आणि अंतर्गत सजावट स्वतः अजित पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली होती. विदर्भ दौऱ्यावर असताना अजितदादा याच बंगल्यावर मुक्कामी असायचे आणि येथील व्यवस्थेची नियमित विचारपूस करायचे.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे, ज्या बंगल्याची निगा स्वतः अजितदादांनी राखली होती, त्याच 'विजयगड'वर आता त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी लागली आहे. हे पाहून अजितदादांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळत आहे.