Teacher Recruitment Investigation Maharashtra SIT
नागपूर: शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्यव्यापी एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. शिक्षक भरती घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली आहे.
शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती नागपूरपासून सुरू होऊन संपूर्ण राज्यभर पसरली असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या एसआयटीमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागी असलेल्या संस्थाचालक, शिक्षणाधिकारी आदींविरोधात सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही गृहराज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.
राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर भरती घोटाळ्यातील पहिल्या गुन्ह्यात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 380 पानांच्या या आरोप पत्रात तत्कालीन निलंबित शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे.
मात्र, अद्यापही या घोटाळ्यातील अनेक महत्त्वाचे आरोपी अटकेबाहेर असल्याने, राजकीय प्रभावातून होत असलेल्या पोलीस तपासावर शिक्षण वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातून आतापर्यंत अनेक शिक्षण संस्था संचालक देखील गजाआड झाले. गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2012 साली थेट शिक्षक भरतीवर बंदी आल्यानंतर या बोगस शिक्षक भरतीला सुरुवात झाली. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देत बोगस शालार्थ आयडी तयार, निर्गमित करून हा मोठा घोळ केला जात होता.