नागपूरः बीड प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे संदर्भात जी काही चौकशी सुरू आहे यात सत्य समोर येईल. केवळ आरोप होत आहेत म्हणून त्यांना राजीनामा मागता येऊ शकत नाही. आरोप सिद्ध झाले तर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागेल. ही हत्येची घटना नक्कीच चुकीची आहे. त्यांचा एक टक्का जरी सहभाग आहे असे वाटल्यास दादा राजीनामा घेतील सध्या राजीनामा देणे गरजेचे नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
आत्राम म्हणाले, धनंजय मुंडेना मीडियातच विरोध आहे पण जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत निर्णय घेणे चुकीचे आहे. विकासासाठी एकत्रित यायला हवे. मागील अडीच दीड वर्षात चांगल्या पद्धतीचा राज्यात विकास झाला. राजकारणात सर्वच शक्य आहे. भुजबळ नाराज यासंदर्भात छेडले असता, ‘परदे मे रहने दो’असे सांकेतिक उत्तर दिले.
दरम्यान, त्यादिवशी शरद पवार आणि भुजबळ यांच्यात काय झाले ते आम्हालाही कळलं नाही. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी स्वाभाविक आहे. मी अजित पवार यांच्यासोबत मागील अनेक वर्षांपासून काम करत आहे. अडीच वर्ष थांबायचे. मी पण वाट पाहत आहोत. मात्र, मला विश्वास आहे. मी शंभर टक्के मंत्री होणार, मंत्री बनणे माझ्या नशिबात आहे. चार वेळा निवडून आलो. चार वेळा मंत्री झालो आता देखील मी मंत्री होणार असा विश्वास माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी बोलून दाखविला. जिल्ह्यात पक्ष संघटनेचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी मजबूत करणार असून जिल्हा परिषद हातात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.