नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपुरातील भांडेवाडी डंपिंग यार्डला शनिवारी लागलेली भीषण आग आज (मंगळवार) चौथ्या दिवशी देखील धुमसतच आहे. नाकातोंडात हा विषारी धूर जात असल्याने नागरिक संतापले आहेत. मनपा प्रशासन मास्क, ओआरएस वाटपाचा देखावा करीत असताना लोक जीव धोक्यात घालून या जळत्या डंपिंग यार्ड ढिगाऱ्याच्याच परिसरात राहत आहेत.
तुलसी नगर, अंतूजी नगर वस्तीकडून मनपा अग्निशमन विभागाचे जेसीबी, फायर टेंडर अजूनही कर्तव्यावर आहेत. या डंपिंग आगीतून विषारी धूर वातावरणात पसरत असल्याने नागरिक दहशतीत आहेत. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपुरात या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान नोंद झालेली असताना या भीषण आगीने यात अधिक भर घातल्याचे नागरिक सांगता आहेत.
पूर्व नागपुरातील भांडेवाडी परिसरात असलेल्या कचरा डम्पिंग यार्डमध्ये साठविलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला शनिवारी दुपारपासून भीषण आग लागली. नागपूर शहर तसेच ग्रामीण मधील 11 फायर टेंडर आग नियंत्रणासाठी लावण्यात आले. वरच्या बाजूने ही आग, धूर यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न मनपाची यंत्रणा करीत आहे.
या आगीचा धूर परिसरातील पवनशक्तीनगर, सूरजनगर, संघर्षनगर, अब्बूमियाँनगर, तुलसीनगरात पसरलेला आहे. आजवर अनेकदा छोट्या मोठ्या आगीच्या घटना या परिसरात घडल्या. मात्र उंच उंच पहाडसारख्या ढिगाऱ्याला लागलेली ही भीषण आग कशामुळे लागली की लावली गेली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.