Pudhari News
नागपूर

Smita Jadhav : महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पदवीधर व शिक्षक मतदारसंघात आम्हाला पहिल्या पसंतीची मते मिळतील

पुढारी वृत्तसेवा

Smita Jadhav Mahayuti support

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : "पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव महायुतीच्या उमेदवार आहेत. महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. काही भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे. स्वतः सुनेत्रावहिनींनी बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. शिवसेनाही त्यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाली आहे. पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांचा आवश्यक कोटा आम्हाला मिळेल. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि. (१८ ऑक्‍टोबर) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

महायुतीला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळेल

नागपूर पदवीधर मतदारसंघात सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी आज शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यापीठ शिक्षण मंचासोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राध्यापकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच शैक्षणिक क्षेत्रात सरकारने केलेल्या कामांची माहिती प्राध्यापकांना दिली. ते म्हणाले की, प्राध्यापक भरतीला सर्वाधिक गती या सरकारनेच दिली आहे. याच कामाच्या आधारावर मी प्राध्यापकांना या निवडणुकीत आमच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आमच्या उमेदवाराला भरघोस मते मिळतील, अशी अपेक्षा आहे. एकंदरीत, वकील, डॉक्टर आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा पाठिंबा आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळेल, असा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीत ताळमेळ नाहीच

महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासूनच मतभेद दिसून येत आहेत. विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात हे मतभेद अधिक स्पष्टपणे जाणवत आहेत. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष एकसंघपणे निवडणुकीत काम करत आहेत. नागपूरचा विचार केला, तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) हे आमचे मित्रपक्ष एकत्रितपणे काम करताना दिसत आहेत. मात्र, अशा प्रकारचे एकत्रित काम महाविकास आघाडीचे घटक पक्ष करताना दिसत नाहीत. सध्याची परिस्थिती महाविकास आघाडीची ताटातूट अशी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

डॉ. स्मिता जाधव यांना महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा पाठिंबा

अमरावतीमध्ये किरण सरनाईक हे महायुतीचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव या महायुतीच्या उमेदवार आहेत. महायुतीचे सर्व घटक पक्ष त्यांच्या पाठीशी आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. काही भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे. स्वतः सुनेत्रावहिनींनी बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. शिवसेनाही त्यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाली असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

पुणे शिक्षक मतदारसंघात आमची मैत्रीपूर्ण लढत

पुणे शिक्षक मतदारसंघात आमची मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे तिथे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. महायुती म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

पक्षातील एखाद्या व्यक्तीची भूमिका म्हणजेच पक्षाची अधिकृत भूमिका नव्हे

मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही महायुतीसोबत आणि सतीश चव्हाण यांच्यासोबत आहोत. भाजप पहिल्या दिवसापासून त्यांच्या प्रचारासाठी काम करत आहे. एखाद्या पक्षातील एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका घेतली, म्हणून ती त्या संपूर्ण पक्षाची अधिकृत भूमिका ठरत नाही. संबंधित पक्षप्रमुखांनी याची दखल घेतली पाहिजे. सर्वजण एकत्र असताना वैयक्तिक पातळीवर अशा प्रकारची भूमिका घेणे योग्य नाही, असा सल्लाही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT