नागपूर : पुढारी वृत्तसेवा
उपराजधानीतला सर्वात मोठा एकता, अखंडता दाखविणारा, सांस्कृतिक, धार्मिक उत्सव मानला जाणाऱ्या श्री पोद्दारेश्वर राम मंदिर येथून निघणाऱ्या ऐतिहासिक श्रीराम शोभायात्रेचे यंदा 59 व्या वर्षी पुन्हा एकदा मुस्लिम समाज बांधव पुष्पवृष्टी आणि शांतीचे प्रतीक असलेली कबूतरे आकाशात सोडून त्याच उत्साहाने स्वागत करण्यात आले.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नागपुरात दोन गटात तणावाची स्थिती निर्माण होत हिंसाचार उसळला, आठवडाभर संचारबंदी कायम राहिली. त्याच तहसील, कोतवाली आणि गणेशपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतून आज रविवारी सायंकाळी श्रीराम शोभायात्रा जाणार असल्याने भाविकांच्या प्रचंड उत्साहात पोलिसांची देखील कसोटी लागणार आहे. राज्य राखीव पोलीस दलासह मोठा तगडा बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला असून अफवा पसरू नयेत म्हणून सोशल मीडियावर नजर आणि ड्रोणच्या माध्यमातून या शोभायात्रेचा मार्गावर निगराणी ठेवली जाणार आहे.
शुक्रवार, शनिवारी पोलिसांनी खबरदारीचा उपाय आणि जनतेत विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने रूट मार्ग देखील केला. श्री पोद्दारेश्वर राम मंदिर येथून 108 मंगल कळसधारी सुवासिनी पुढे निघाल्यानंतर या शोभायात्रेचे मोमीनपुरा परिसरात नेहमीप्रमाणे अमन शांती सेवा समितीतर्फे आरिफभाई आणि त्यांचे सहकारी सर्वात पहिले स्वागत करणार आहेत.
नागपुरातच नव्हे देशभरात हिंदू मुस्लिम भाई-भाई, अमन, एकता, शांती कायम राहावी, देश प्रगतीपथावर जावा ही आपली सदिच्छा असून वडिलोपार्जित सुरू असलेली परंपरा 59 व्या वर्षी देखील आम्ही पुढे नेत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अधिकारी आज प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून या शोभायात्रेचा मार्ग सुकर करीत आहेत.