Shiva App Online Satta Pudhari Photo
नागपूर

'महादेव'नंतर आता 'शिवा' ॲपचा धुमाकूळ; छत्तीसगड पोलिसांची नागपुरात धडक कारवाई, ६ सट्टेबाजांना अटक

Shiva App Online Satta: नागपुरातून चालवले जात होते देशव्यापी सट्टा रॅकेट; मोठ्या प्रमाणात बँक पासबुक, एटीएम कार्ड जप्त

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यामुळे देशभरात खळबळ माजवणाऱ्या 'महादेव ॲप'चा काळा अध्याय संपतो न संपतो तोच, आता 'शिवा ॲप'च्या नावाने हाच गोरखधंदा पुन्हा फोफावत असल्याचे उघड झाले आहे. या देशव्यापी रॅकेटच्या मुळावर घाव घालत छत्तीसगड पोलिसांनी नागपुरात एक मोठी कारवाई केली असून, सहा जणांना अटक केली आहे. तपास यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी नाव बदलून हा सट्टा बाजार चालवला जात होता.

छत्तीसगड पोलिसांची नागपुरात धडक

छत्तीसगडमधील खैरागड पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. महादेव ॲपवर कारवाईचा फास आवळल्यानंतर आरोपींनी 'शिवा ॲप'च्या माध्यमातून आपला अवैध व्यवसाय सुरू ठेवला होता. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राजनांदगाव पोलिसांनी केला आणि त्याचे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचल्याचे लक्षात येताच, छत्तीसगड पोलिसांच्या पथकाने नागपुरात छापा टाकला. यामध्ये धनंजय सिंग, चंद्रशेखर अहिरवार, दुमेश श्रीवास, निकुंज पन्ना, समीर बडा, छत्रपाल पटेल यांचा अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे.

आर्थिक व्यवहारांचे मोठे जाळे उघड

पोलिसांनी आरोपींकडून सट्टा बाजारासाठी वापरले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. यामध्ये २६ एटीएम कार्ड, १८ बँक पासबुक आणि १४ चेकबुक यांचा समावेश आहे. यावरून या रॅकेटचे आर्थिक व्यवहार किती मोठ्या प्रमाणावर पसरले होते, याचा अंदाज येतो. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, सट्ट्यातून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी आणि ते मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'हवाला' मार्गाचा वापर केला जात होता. या कारवाईमुळे ऑनलाईन सट्टा रॅकेटचे आंतरराज्य धागेदोरे उघड झाले असून, या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT