नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'हिंदू दहशतवाद' संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिवसेनेने (शिंदे गट) नागपुरात आक्रमक भूमिका घेतली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वाखाली भांडे प्लॉट येथे तीव्र आंदोलन करत चव्हाण यांच्या फोटोला पायदळी तुडवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "हे वक्तव्य म्हणजे संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान आहे," अशी संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'हिंदू दहशतवादा'बद्दल विधान केले होते. या विधानामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत शिवसेनेने आज निषेध नोंदवला. खासदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध करणारे फलक झळकावले.
यावेळी बोलताना खासदार कृपाल तुमाने म्हणाले, "पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आणि संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करणारे आहे. मतांच्या राजकारणासाठी त्यांनी ही पातळी गाठली आहे. त्यांनी तात्काळ आपले वक्तव्य मागे घेऊन हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा शिवसेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल," असा स्पष्ट इशारा तुमाने यांनी दिला.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, विनोद सातंगे, युवा सेनेचे सचिव शुभम नवले, जिल्हाप्रमुख निलेश तिघरे, महिला आघाडीच्या प्रमुख नेहा भोकरे, करुणा आष्टणकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनामुळे नागपुरातील राजकीय वातावरण तापले असून, आता पृथ्वीराज चव्हाण यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.