राजेंद्र उट्टलवार
नागपूर : मुख्यमंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद आणि महत्त्वाची मंत्रिपदे नागपूर, पूर्व विदर्भात राहणार असताना राज्याच्या इतर भागाचा समतोल साधताना 132 आमदार निवडून आलेल्या भाजपची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटीच लागणार आहे. यामुळेच गेल्या मंत्रिमंडळातील काहींना हाय कमांडच्या रिपोर्ट कार्डनुसार नारळ दिला जाऊ शकतो. नागपूर, विदर्भातून राज्य मंत्रीमंडळामध्ये कुणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गृह खात्याच्या गुंतागुंतीत गुरुवारी एकाही कॅबिनेट मंत्र्यांला शपथ न दिल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर 'कही खुशी कही गम... !'प्रकर्षाने दिसत होते. अधिवेशनापूर्वी आगामी काही दिवसांमध्येच तीनही पक्षांच्या ठराविक मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. अर्थातच आपला नंबर कधी ? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीला भक्कम बहुमत प्राप्त झाले. ‘नागपूरकर’ देवेंद्र फडणवीस यांनी तिस-यांदा मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. त्यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
विदर्भातून पहिल्या टप्प्यात चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, धर्मरावबाबा आत्राम, संजय कुंटे यांना हमखास संधी मिळू शकते. याशिवाय आशिष जैस्वाल, रवी राणा, कृष्णा खोपडे, समीर मेघे, आशिष देशमुख, मोहन मते यापैकी कुणाला राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते याविषयी उत्सुकता आहे. नागपूर करारानुसार दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संत्रानगरी नागपूर येथे होत असते. अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ठरले. आता अनेकांना आपल्या खात्याचे, कामाचे मंत्री कोण, याची उत्सुकता लागली आहे.