नागपूर

रेल्वे सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेने झाली तिची सुखरूप सुटका!

Shambhuraj Pachindre

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील कामठी स्थानकावर रेल्वे पोहचताच दिव्यांग डब्यात प्रवास करणाऱ्या एका मुकबधीर महिलेला जोरदार वेदना सुरू झाल्या. लगेच इतर प्रवाशांनी आरडाओरड केली. प्रवाशांची आरडाओरड ऐकताच रेल्वे स्थानकातील सुरक्षा रक्षकांनी वेळीच धाव घेऊन तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध केली आणि अवघ्या काही वेळातच तिची प्रसव वेदनांमधून सुटका झाली.

रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्यामुळे कामठी रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या विकलांग डब्यातून प्रवास करणारी मूकबधिर महिला प्रवासी व तिची कन्या सुखरूप आहेत. दक्षिण पूर्व रेल्वे सुरक्षा मंडळ आयुक्त नागपूर येथील पोलीस उपनिरीक्षक विजय भालेकर महिला आरक्षण भीष्मा शर्मा हे कामठी रेल्वे स्थानकावर कार्यरत असतांना सायंकाळी सहाच्या सुमारास कामठी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर एक्सप्रेस गाडी क्रमांक 11040 डाउन महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूरवरून गोंदियाकडे जात होती. यावेळी दिव्यांग कोचमध्ये ही मूकबधिर महिला प्रवासी आपल्या पतीसोबत प्रवास करीत होती. कामठी रेल्वे स्थानकात येताच महिला प्रवासी विमला तेलम यांना प्रसूतीच्या जोरदार वेदना सुरू झाल्या.

हे दृश्य पाहून काही प्रवाशांनी आरडाओरड केली. यामुएळे कामठी रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक विजय भालेकर, महिला आरक्षक भीष्मा शर्मा यांनी धाव घेत दिव्यांग डब्यात जावून महिला प्रवासी विमला तेलम व त्यांचे पती यांना त्वरित रेल्वे स्थानकावर उतरवले. यानंतर रिक्षाने महिलेला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. .वेळीच आरोग्य सुविधा मिळाल्याने महिला प्रवासी व तिच्या कन्येची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घडलेला प्रकार सी.सी.टिव्हीत कैद झाला. कामठी रेल्वे स्थानकावरील सुरक्षा मंडळ आयुक्त दीपचंद आर्य, विजय भालेकर, महिला आरक्षक भीष्मा शर्मा यांनी "ऑपरेशन मातृशक्ती" अंतर्गत दाखविलेल्या तत्परतेची शहरात सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.

SCROLL FOR NEXT