नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे सामोरे जाण्याची आमची इच्छा आहे. परंतू इतर मित्र पक्षांकडून साथ न मिळाल्यास आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी आहे, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने महाविकास आघाडीची चिंता वाढविली आहे.
निवडणुकीसाठी वेळ असला तरी अद्यापही आघाडी संदर्भात चर्चा करण्यासाठी कोणताही निरोप नाही. मागील जिल्हा परिषद व पंचायत समीतीच्या निवडणुकीत आघाडी धर्म न पाळता आमच्या पक्षाच्या विरोधात काँग्रेसने अधिकृत उमेदवार उभे केले होते. त्यांची जर आमच्यासोबत आघाडी करण्याची तयारी नसेल तर आमची इतर समविचारी पक्षांना सोबत घेवून स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रविण कुंटे पाटील यांनी शनिवारी (दि.२७) दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लवकरच होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून लढविण्यासाठी आग्रही आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून आघाडीचा धर्म पाळला. त्यामुळेच रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकले हे विसरून चालणार नाही. परंतु मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा आमचा अनुभव चांगला नाही. मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या विधानसभेत ज्या पक्षाचा आमदार आहे, तेथे मित्र पक्षाला एक जिल्हा परिषद जागा देण्याचे ठरले होते. आमच्या पक्षाच्या वतीने आघाडी धर्म पाळून काँग्रेस पक्षासाठी जागा सोडल्या. परंतू, काँग्रेसने त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आमच्यासोबत दगा केला आणि आम्ही एका जागी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसचा अधिकृत उमेदवार उभा केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वेळेवर आमची गोची होवू नये, म्हणून आम्ही समविचारी पक्षासोबत चर्चा सुरु केली आहे. काही दिवसातच आरक्षण जाहीर होणार असल्याची माहिती आहे. सध्या नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलमधील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठकीचे सत्र सुरु आहे. तसेच मतदार याद्यांवर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती प्रविण कुंटे यांनी दिली.