संस्कृतला राजाश्रयासोबतच लोकाश्रयदेखील हवा : डॉ.मोहन भागवत  
नागपूर

Sanskrit language| संस्कृतला राजाश्रयासोबतच लोकाश्रयदेखील हवा : डॉ.मोहन भागवत

देशातील सर्व भाषांचे मूळ संस्कृतमध्येच

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आपले ‘स्व’त्व कळले पाहिजे. संस्कृत भाषेला राजाश्रयासोबत लोकाश्रयदेखील मिळायला हवा. यासंदर्भात संस्कृत विद्यापीठाकडून प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. देशातील सर्व भाषांचे मूळ संस्कृतमध्येच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वारंगा येथील अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरात डॉ.केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू डॉ. हरेराम त्रिपाठी, माजी कुलगुरू डॉ.पंकज चांदे, डॉ.उमा वैद्य, संचालक कृष्णकुमार पांडे यांची प्रामुख उपस्थिती होती.

भागवत म्हणाले, जिथे स्वत्व असते तिथे बळ, ओज व लक्ष्मी यांचा निवास असतो. स्वत्व नसले तर बळदेखील नाहीसे होते. स्वनिर्भरता आली की बळ, ओज, लक्ष्मी आपोआपच येतात. भारताची परंपरा फार प्राचीन आहे. पाश्चात्य इतिहास गृहीत धरला तरी इसवी सन एकपासून सोळाशेपर्यंत भारतच अग्रेसर होता. आपले स्वत्व विसरलो तेव्हापासून आपली घसरण सुरू झाली व आपण परकीय आक्रमकांचे भक्ष्य बनलो. इंग्रजांनी तर आपल्या बुद्धीलाही गुलाम करण्याची पद्धत विकसित केली. आता आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आपले स्वत्व आपल्याला पूर्णपणे कळले पाहिजे.

भाषा ‘स्व’भाव प्रकट करण्याचे साधन

आपला स्वभाव प्रकट करण्याचे साधन भाषा ही आहे. त्यातून माणसांचा जीवनव्यवहार उभा होता. जसा समाजाचा भाव असतो तशी तेथील भाषा असते. सहजपणे पाश्चिमात्यांनी ग्लोबल मार्केट हा एक वाक्यप्रचार विकसित केला. मात्र, तो अपयशी ठरला. आपण त्यांना वसुधैव कुटुंबकमचा विचार दिला. आपली भाषा हे आपल्या भावाचे फलित आहे, असेही सरसंघचालक म्हणाले. संस्कृत जाणणे म्हणजे भारत जाणणे आहे. ज्याला संस्कृत माहिती आहे तो कोणतीही भाषा लवकर शिकू शकतो. संस्कृत भाषेतून आपली परंपरा, भाव विकसित झाला आहे. ती सर्वांना कळली पाहिजे. जर त्यातून जीवन व्यवहार झाला तर त्यातून संस्कृतचादेखील विकास होईल. शब्दांची सर्वात जास्त संपदा संस्कृतमध्ये आहे व ती अनेक भाषांची जननी झाली. देशातील सर्व भाषांचे मूळ संस्कृतमध्येच आहे. देशकाल परिस्थितीनुसार भाषेचा विकासदेखील होत असतो. संस्कृत जीवनव्यवहारात आली पाहिजे आणि आपल्याला बोलता आली पाहिजे.

संस्कृत विद्यापीठांवर जबाबदारी

संस्कृत भाषा ही शास्त्राची भाषा आहे. त्याच्या संभाषणाचा अभ्यास झाला पाहिजे. त्यासाठी संस्कृत विद्यापीठातून पदवी घेतली पाहिजे, असे नाही. संस्कृत भाषा कळत नाही, पण परंपरेने पाठांतर असलेली घरे भरपूर आहेत. घरोघरी संस्कृत पोहोचून त्यातून संभाषण होणे आवश्यक आहे. संस्कृत भाषेला राजाश्रय पाहिजे. भारतीयांचे स्वत्व जागे करण्यासाठी देशातील सर्व भाषांचा व त्या भाषेची जननी संस्कृतचा विकास व्हायला हवा. भाषेला राजाश्रयासोबत लोकाश्रयदेखील मिळायला हवा. यासंदर्भात संस्कृत विद्यापीठाकडून प्रयत्न व्हायला हवे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT