नागपूर: 2 सप्टेंबर 2025 म्हणजेच 310 दिवसांपासून मराठा समाजात केवळ 98 जात प्रमाणपत्र देण्यात आले. शैक्षणिक, महसूली पुराव्यांची नियमावली घातली आहे. त्यामुळे ओबीसीचे कुठेही नुकसान होणार नाही हे मी पूर्वीपासून सांगत होतो. आजही तेच सांगतोय आणि आकडेवारीवरून सुद्धा हे सिद्ध होत असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.
ज्या अटी टाकण्यात आल्या त्या अटीनुसारच प्रमाणपत्र वाटप केल्या जात आहे. कदाचित हे काढण्यात आलेले प्रमाणपत्र मुलांच्या शाळेच्या कामाकरिता काढले असावे. त्याच्या आजोबा किंवा वडिलांकडे असलेल्या जात नोंदणीचा साहाय्यानेच घेऊन हे प्रमाणपत्र काढले असावे. याशिवाय काही प्रमाणपत्र हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सुद्धा काढले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी या सगळ्या बाबींवर लक्ष ठेवून आहेत. कुठे नियमाला बगल देऊन काम होत असल्याचे लक्षात आल्यास आम्ही त्यावर आक्षेप घेऊ आणि पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी करू असा इशाराही डॉ तायवाडे यांनी दिला. हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ ९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यासाठी केवळ ५९४ जणांनी अर्ज केले होते. ९८ अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही करण्यात आली. त्यात सर्वाधिक ४४५ अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातील आहेत यावर भर दिला.