नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांनी आज सोमवारी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. आमदार जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर समर्थक, भाजप कार्यकर्त्यांनी भाऊंनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी घोषणाबाजी करीत आग्रह धरला आहे.
आमदार जोशी यांची टर्म 13 मे पर्यंत असताना त्यांनी आज भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होत असलेली घुसमट एका पत्रातून स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.विशेष म्हणजे आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंबधी कल्पना दिली आहे. त्यांनी निर्णयाची मोकळीक दिल्याचे आमदार जोशी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. नुकतीच मनपा निवडणूक आटोपली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नवोदितांना तिकीट देताना, निष्ठावंतांवर अन्याय झाला. इतर पक्षातून आलेल्यांना संधी मिळाली. यातून भाजपात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी जाणवली.
पदाधिकाऱ्यांचे राजीनामा नाट्य अजून सुरूच आहे. यामुळेच सत्ता आली तरी 120 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपला साध्य करता आले नाही. अनेक समर्थकांना आपण न्याय देऊ शकलो नाही या भावनेतून तर त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले नाहीत ना, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. आता मला थांबायचे आहे.... असे त्यांनी नमूद केलेल्या या पत्रातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. मुख्यमंत्री परदेशात असताना आमदार संदीप जोशी यांच्या या पत्राला राजकीय महत्त्व आले आहे.