राजेंद्र उट्टलवार
नागपूर : माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख व सलील देशमुख यांचे आज नागपूर जिल्ह्यात काटोल विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. गेली २५ वर्षे या परंपरागत मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे अनिल देशमुख यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली. एबी फॉर्म दिला मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांचे सुपुत्र सलील देशमुख अर्ज दाखल करणार असल्यावर एकमत झाले.
यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता एका सभेचे, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली जंगी अशीच झाली मात्र, फिरता- फिरता नियोजित वेळेपेक्षा दोन मिनिटे उशीर झाला आणि त्या दिवसाची अर्जाची वेळ संपली, आता आज मंगळवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.
२०१९ साली देखील याच पद्धतीने अनिल देशमुख यांची रॅली नियोजित वेळेत पोहोचू शकली नव्हती हे विशेष. २५ ते २७ हजार नागरिकांची उपस्थिती, प्रचंड गर्दी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे सलील देशमुख यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन मिनिटांचा उशीर झाल्यामुळे ते आज मंगळवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकंदरीत काटोलच्या उमेदवारीवरून हा ट्विस्ट पाहायला मिळाला असताना आता पुन्हा उमेदवार बदलाचा ट्विस्ट पाहायला तर मिळणार नाही ना?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपने या मतदारसंघातून चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. देशमुख यांचे पुतणे डॉ. आशिष देशमुख यांना सावनेर मतदारसंघात पाठविण्यात आले आहे.
विदर्भात तीन आमदारांचे भाजपने तिकीट कापले. भाजपच्या तिसऱ्या यादीत मध्य नागपुरातून आमदार विकास कुंभारे यांना संधी नाकारत आमदार प्रवीण दटके तर आर्वी येथून दादाराव केचे यांना डावलून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक सुमित वानखेडे यांना संधी दिली गेली. आर्णी येथे संदीप धुर्वे यांचे तिकीट कापून अलीकडेच भाजपात आलेले माजी आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी देण्यात आली. वरुड मोर्शी मतदार संघात भाजपने यावलकर यांची प्रवेशानंतर उमेदवारी निश्चित केलेली असताना राष्ट्रवादी अजित दादा गटाने मात्र आमदार देवेंद्र भुयार यांच्या हाती घड्याळ सोपवले आहे. दोघांकडेही एबी फॉर्म असल्याने आता या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हे आहेत.