file photo
नागपूर

सत्तापक्ष म्हणतो शाश्वत विकासाला गती, विरोधकांचे टीकास्त्र !

Maharashtra budget 2025 | महाराष्‍ट्राच्या बजेटवर संमिश्र प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

नागपूरः महायुती सरकारचा अर्थसंकल्प शाश्वत विकासाला गती देणारा, भविष्याचा वेध घेणारा असल्याचे स्वागत सत्तारूढ पक्षाने केले आहे. दुसरीकडे विरोधकांनी हा अर्थसंकल्प निव्वळ बनवाबनवी असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. बघूया, विदर्भातील महत्वाच्या सर्वपक्षीय प्रतिक्रिया..

सर्वसामान्यांच्या जीवनात होणार बदल - संजय राठोड

शेतकरी, महिला, विद्यार्थी, कर्मचारी, कामगार, उद्योजक अशा सर्व घटकांसाठी आजच्या अर्थसंकल्पातून भरीव तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची घोषणा करून त्यांची अंमलबजावणी करणारा हा अर्थसंकल्प आहे.

भविष्याचा वेध घेणार अर्थसंकल्‍पः आमदार कृपाल तुमाने

सर्व घटकांचा विचार करून भविष्यातील शाश्वत विकासाला गती देणारा अर्थसंकल्प महायुती सरकारने सादर केला असून यामुळे महाराष्ट्राची सर्वांगिण प्रगती साधली जाणार आहे, विमानतळांचे आधुनिकीकरण, मेट्रो, रेल्वे, रस्ते वाहतुकीतून मोठा रोजगार मिळणार असून यातून महाराष्ट्र अग्रेसर होणार आहे. मागील अडीच वर्षांत महायुतीने कल्याणकारी योजनांमधून जनतेचा विश्वास संपादन केला होता, त्या विश्वासाला सार्थ करणारा हा अर्थसंकल्प आहे.

रोजगारक्षम युवा शक्तीला बळ- जयदीप कवाडे

5 वर्षाच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणुक तसेच यातून 50 लाख रोजगार निर्मिती लक्ष्यपूर्ती करण्याचा ध्यास रोजगारक्षम युवा शक्तीला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांनी व्यक्त केली.

विदर्भाच्या जनतेवर अन्याय - डॉ. नितीन राऊत

विदर्भातील जनतेवर अन्याय करणारा, भांडवलशाहीला पोसणारा आणि श्रमिक-विरोधी अर्थसंकल्प असल्याची टीका काँग्रेसचे नेते, जी मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केली आहे. केवळ घोषणांचा पाऊस पाडणारा अर्थसंकल्प असून विदर्भाला नेहमीच झुकते माप मिळेल व योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा दावा मुख्यमंत्री यांनी केला. मात्र प्रत्यक्ष आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी निधी खेचून आणण्यात विदर्भातील मंत्री पूर्णतः अपयशी ठरले.

अर्थहीन संकल्प - गिरीश पांडव

आजचा ‘अर्थ’ हिन संकल्प म्हणजे महाराष्ट्रातील महिला मतदारांचा अपमान असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गिरीश पांडव यांनी केली आहे.

विकसित महाराष्ट्राच्या पाऊलखुणा - बावनकुळे

विकसित महाराष्ट्राच्या पाऊलखुणा राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित झाल्या. राज्याच्या शाश्वत विकासाची रूपरेषा यात समर्थपणे मांडण्यात आली आहे. राज्य शासनासह केंद्र सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला कसा मिळेल हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

आश्वासनांची पूर्तता नाही - अनिल देशमुख

विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू व लाडक्या बहिणींना मिळणारे १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करू असे आश्वासन देण्यात आले होते. अर्थसंकल्पात याचा कुठेही उल्लेख नाही. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न कुठेही उल्लेख नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

घोर निराशा करणारे बजेट, रमेशचंद्र बंग

शेतकरी शेतमजूर व युवकांची घोर निराशा करणारे बजेट आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस उपाय योजना नाही तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल यासाठी ठोस पावले उचलली नाही, उद्योग, शिक्षण, महिला यांच्यासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही असे माजी मंत्री रमेश बंग म्हणाले.

ग्रामीण विकासावर भर - डॉ आशिष देशमुख

शेतकरी, महिला, रोजगार, उद्योगधंदे, कौशल्य विकास, पर्यटन, ग्रामीण विकास, क्रीडा, सिंचन, शिक्षण, आरोग्य अशा अनेक विषयांवर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने याचा फायदा विदर्भाला नक्कीच होणार असल्याचे भाजपाचे आमदार डॉ आशिष देशमुख म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले, दादा लाडक्या बहिणीना विसरले !

ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला. निवडणुकी आधी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे आता गुलाबी जॅकेटही विसरले आणि लाडक्या बहिणींना विसरले अशी टीका काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांशी देखील सरकारने गद्दारी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीत दिले होते. बँका आता शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही याला कोण जबाबदार, केवळ शहरी भागातील प्रकल्प म्हणजे कंत्राटदारांसाठी हे बजेट आहे का? दलित, वंचित, आदिवासी सर्वसामान्यांचा विसर या सरकारला पडल्याची टीका विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

घोषणा करुन सर्वच घटकांची दिशाभूल : प्रतिभा धानोरकर

या अर्थ संकल्पात शेतकरी, शेतमजूर,उद्योजकांना त्याच्या वाट्याला काही तरी अशी अपेक्षा होती परंतु सर्वांचा अपेक्षा व्यर्थ ठरल्या आहेत. सन 2025-26 चा अर्थसंकल्प हा राज्यातील सर्वच घटकांना फसविणारा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. या अर्थ संकल्पात शेतकरी कर्ज माफीची घोषणा होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झालेली नाही. लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता या अर्थ संकल्पात झालेली नाही. केवळ घोषणा करुन सर्वच घटकांची दिशाभुल केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT