RTMNU non teaching staff protest  Pudhari
नागपूर

Nagpur University News | नागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; पाचव्या दिवशी निषेधसभा

१८ ते २० मेदरम्यान धरणे व निषेध आंदोलन करण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

RTMNU non teaching staff protest

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी पाचव्या दिवशीही कायम राहिले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेधसभा घेण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, १८ ते २० मेदरम्यान धरणे व निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांनी १४ मेपासून काळ्या फिती लावून आंदोलनाची सुरुवात केली आहे. शासनाकडून प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० आणि ३० वर्षांनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना लागू करणे, सातवा वेतन आयोग तातडीने अंमलात आणणे, २००५ पूर्वी जाहिरात प्रक्रिया पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त शिक्षकेतर पदभरतीस मंजुरी देणे, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित लाभ तातडीने अदा करणे यांचा समावेश आहे.

याशिवाय प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचरांना रजा रोखीकरणाचा लाभ पुन्हा सुरू करणे, ग्रेड पेप्रमाणे वेतन निश्चिती करणे, पदोन्नतीतील प्रमाणात बदल करून ८० टक्के पदे पदोन्नतीने भरण्यास मंजुरी देणे तसेच डीसीपीएस कपात पूर्ववत सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

या मागण्यांचे निवेदन कुलगुरूंना सादर करण्यात आले. आंदोलनात विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT