मेडिकल व सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयातील देशातील पहिली रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया केली.  Pudhari Photo
नागपूर

आता हृदय न उघडता देखील रोबोद्वारे बायपास !

देशातील शासकीय रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : हृदय न उघडता बायपास सर्जरी होऊ शकते का, हो हे शक्य आहे आणि ते देखील रोबोटिक पद्धतीने होऊ शकते. देशातील अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया नागपुरातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नुकतीच पार पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील देशातील ही पहिली रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया आहे. मेडिकल व सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली.

शहनाज बेगम (५५, रा. मोठा ताजबाग, नागपूर) असे या महिला रुग्णाचे नाव आहे. २६ जानेवारीला त्या कुटुंबासह विमानाची हवाई कसरत बघायला गेल्या होत्या. यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखत असल्याने कुटुंबीयांनी मेडिकल रुग्णालयात हलवले. डॉक्टरांकडून तपासणी केली तर रुग्णाच्या ह्रदयाचे पंपिंग ३५ टक्क्यांपर्यंत खाली व मुख्य रक्त वाहिनीत ९९ टक्के ब्लॉक्स आढळले. रुग्णाला तातडीने सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हलवले गेले. ह्रदय शल्यक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सतीश दास यांनी बायपास शस्त्रक्रिया गरजेची असल्याचे नातेवाईकांना सांगितले.

दरम्यान, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रोबोटिक बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. आठ दिवसांपूर्वी मेडिकल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. या महिलेचे हृदय पूर्ण न उघडता १० एमएमच्या छिद्रातून ही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. अत्यंत कमी रक्तस्त्राव, खूपच कमी टाके लागल्याची माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. डॉ. सुधीर श्रीवास्तव, डॉ. बतकल, डॉ. रेवतकर आणि चमूची भूमिका यात महत्वाची होती. हृदय शल्यक्रियाशास्त्र विभागाचे डॉ. सतीश दास, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, ज्येष्ठ कान-नाक- घसा रोगतज्ज्ञ डॉ. अपूर्व पावडे प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.

लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण

मेडिकल रुग्णालयात लवकरच रोबोटिक पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपणही केले जाणार असल्याचेही डॉ. राज गजभिये यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT