नागपूर : भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केलेली नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध आहे. तर एसटी भाडेवाढ केली कुणी? असा सवाल उपस्थित करताना ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
एसटी दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाहीत तर मग या परिवहन खात्याला वाली कोण?, असा सवालही वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? असेही ते म्हणाले.
मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढी विरोधात आहेत. तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, तर हा पोरखेळ आहे. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? शेवटी निर्णय अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केले आणि चांगले काही झाले की आपण श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.