नागपूर; पुढारी वृत्तसेवा : रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या छाननीअंती ३५ उमेदवार वैध ठरले आहेत. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी जात प्रमाणपत्र कारणावरून बाद ठरल्याने त्यांचे पती श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे उमेदवार जाहीर झाले. यापूर्वी विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसचे आमदार राजू पारवे राजीनामा देत शिवसेनेचे उमेदवार झाले. काँग्रेसचे गेल्या निवडणुकीत उमेदवार असलेले किशोर गजभिये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीपासून 'वंचित' झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे. दोन एबी फॉर्मच्या गोंधळात भाजपचे माजी सभापती शंकर चहांदे आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याचे जाहीर झाले. एकंदरीत अनेक नाट्यमय घडामोडी अनुभवणाऱ्या रामटेक मतदारसंघात आज (दि.३०) कोण माघार घेणार, कोण रिंगणात राहणार हे उघड होणार असून रविवारपासून प्रचाराला रंग चढणार आहे. १९ अपक्ष उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत.
वैध उमेदवारांमध्ये राजू पारवे (शिवसेना), श्यामकुमार बर्वे (इंडियन नॅशनल काँग्रेस), संदीप मेश्राम (बहुजन समाज पार्टी), आशिष सरोदे (भीमसेना), उमेश खडसे (राष्ट्र्र समर्पण पार्टी), मंजुषा गायकवाड (अखिल भारतीय परिवार पार्टी), गोवर्धन कुंभारे (वीरो के वीर इंडियन पार्टी) , प्रमोद खोब्रागडे (आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडिया), अॅड. भीमराव शेंडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), भोजराज सरोदे (जय विदर्भ पार्टी), रिध्देश्वर बेले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), रोशनी गजभिये (गोंडवाना गणतंत्र पार्टी ), शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी), सिध्दार्थ पाटील (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक), संजय बोरकर (महा -राष्ट्र विकास आघाडी ), संविधान लोखंडे (बळीराजा पार्टी ), अजय चव्हाण (अपक्ष ), अरविंद तांडेकर (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), मा.कु.कार्तिक डोके (अपक्ष), किशोर गजभिये (अपक्ष), गोवर्धन सोमदेवे (अपक्ष), गौरव गायगवळी (अपक्ष), सौ.दर्शनी धवड (अपक्ष), नरेश बर्वे (अपक्ष) , प्रकाश कटारे (अपक्ष), प्रेमकुमार गजभारे (अपक्ष), सुरेश लारोकर (अपक्ष), डॉ.विनोद रंगारी (अपक्ष), विलास झोडापे (अपक्ष), सुनील साळवे (अपक्ष), सुभाष लोखंडे (अपक्ष ), सुरेश साखरे (अपक्ष ), संदीप गायकवाड (अपक्ष), विलास खडसे (अपक्ष) यांचा समावेश आहे. आज (शनिवारी) अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.