नागपूर: नागपुरातील सोलर ग्रुपने तयार केलेले नागास्त्र ड्रोन ‘आॅपरेशन सिंदूर’ दरम्यान यशस्वीरित्या वापरले गेले. या ड्रोनने दहशतवादी लक्ष्यांवर अचूक मारा केल्यामुळे त्याची सामरिक क्षमता सिद्ध झाली. भविष्यात गरज पडल्यास ही शस्त्रे देशाच्या शत्रूंसाठी अत्यंत घातक ठरतील, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि.१८ जानेवारी) व्यक्त केला.
नागपुरातील सोलर कंपनीने विकसित केलेल्या ‘भार्गवास्त्र’ काउंटर ड्रोन प्रणालीच्या यशस्वी चाचणी प्रक्षेपणामुळे खाजगी क्षेत्राची तांत्रिक क्षमता दिसून येते. या सुविधेत विकसित केलेल्या पिनाका क्षेपणास्त्रांची निर्यात सुरू झाली आहे, जे देशाची निर्यात क्षमता आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने संरक्षण उद्योगाची क्षमता दर्शवते. येत्या काळात संरक्षण उत्पादनातील खाजगी क्षेत्राची भूमिका ५० टक्के किंवा त्याहून अधिक व्हावी, यावर सरकार लक्ष केंद्रीत करत आहे, यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भर दिला. नागपुरातील सोलर डिफेन्स अॅण्ड एरोस्पेस लिमिटेडमध्ये मध्यम कॅलिबर दारूगोळा उत्पादन सुविधेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली ही सुविधा, ३० मिमी दारूगोळा तयार करणारा पूर्णपणे स्वयंचलित प्रकल्प आहे. जो भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. त्यांनी पिनाका रॉकेट उत्पादन सुविधेलाही भेट दिली आणि आर्मेनियासाठी मार्गदर्शित पिनाका रॉकेटच्या पहिल्या तुकडीला हिरवी झेंडी दाखविली़. सरकार खाजगी क्षेत्राला बळकट करण्यासाठी आणि देशांतर्गत विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या वस्तूंचे उत्पादन आपण करू शकत नाही, त्यांच्यासाठीही किमान ५० टक्के स्वदेशी घटकांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सोलर डिफेन्स अॅण्ड एरोस्पेस लिमिटेडचे प्रमुख सत्यनारायण नुवाल प्रामुख्याने उपस्थित होते़.
राजनाथसिंह म्हणाले, देशात एक काळ होता जेव्हा दारुगोळ्याच्या कमतरतेमुळे देशाच्या संरक्षण सज्जतेत अडथळे येत होते़. यामुळे या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची गरज सरकारला प्रकर्षाने जाणवली. दारूगोळा उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्याच्या आणि देशाला या क्षेत्रात जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची वचनबद्धता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यात खाजगी क्षेत्राच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले, देश दारूगोळा उत्पादनात सातत्याने पुढे जात आहे, कारण तो दर्जेदार आणि विश्वसनीय उत्पादने तयार करत आहे. २०२१ मध्ये खाजगी क्षेत्राद्वारे उत्पादित, पूर्णपणे भारतीय बनावटीचा मल्टी-मोड हँड ग्रेनेड भारतीय लष्कराला सुपूर्द केल्याचा विशेष उल्लेख त्यांनी यावेळी केला.