नागपूर : राज्यात आणि केंद्रात सत्ता नाही आणि भविष्यात येण्याची शक्यता नसल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद घेण्यास कुणीच तयार नाही, अशी टीका करतानाच उबाठा शिवसेनेमध्ये भविष्य नसल्याने अनेक जण महायुतीत येत आहेत. कोण कुठल्या पक्षात गेल्याने कुणाचा फायदा होईल, यावर मी बोलणार नाही मात्र उबाठातील शिवसेना नेत्यांना आता सन्यास घेतल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
ऑपरेशन टायगर, राजन साळवी यांचा शिंदे गटातील प्रवेश या संदर्भात ते बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची चर्चा असल्याकडे लक्ष वेधले असते विखे पाटील म्हणाले, सपकाळ यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. मात्र काँग्रेसमध्ये सत्ता होती म्हणून लोक होते. आज सारे पळ काढत आहेत. यामुळे दिग्गजांना डावलून त्यांना संधी दिली गेली असे वगैरे काहीही नाही. कधीकाळी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद हे फार महत्त्वाचे मानले जात होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये अनेक जण उत्सुकही होते.
दिल्लीपर्यंत त्यांच्या विरोधात बरेच राजकारण देखील झाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आज आणि भविष्यातही काँग्रेसला फारशी संधी नसल्याने आता कोणीही कुठली जबाबदारी घेण्यास इच्छुक नाही. आज ज्या नावांची प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा आहे त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती असून यामुळेच हर्षवर्धन सपकाळ यांना ही जबाबदारी दिली जात असल्याचा टोला देखील विखे पाटील यांनी लगावला.