नागपूर

नवनीत राणांना पक्षातून बाहेर काढा...! ; प्यारे खान आक्रमक

मोदी-शहांकडे तक्रार करणार असल्याचे देखील राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : अमरावती येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "नवनीत राणा यांना अमरावतीत दंगली घडवायच्या आहेत," असा गंभीर आरोप करत त्यांनी राणा यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचे खान यांनी स्पष्ट केले.

नेमके प्रकरण काय?

अमरावती जिल्ह्यातील अप्रिय घटनेनंतर राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या पथकाने परतवाडा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यानंतर नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्यारे खान यांनी वास्तव मांडले. त्यांच्या मते, या घटनेला कोणताही धार्मिक रंग नसताना राजकीय फायद्यासाठी अफवा पसरवल्या गेल्या.

प्यारे खान यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे

नवनीत राणा विकासात अडथळा आणत आहेत. त्यांना तातडीने पक्षातून बाहेर काढावे, अशी मागणी मी पत्राद्वारे मोदी आणि शहा यांच्याकडे करणार आहे,असे खान म्हणाले. नवनीत राणा यांनी हा सर्व प्रकार केवळ सोशल मीडियावरील 'रिल्स' आणि प्रसिद्धीसाठी केल्याचा टोला त्यांनी लगावला. जर पोलिसांनी आरोपींसोबत फोटो काढले असतील, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांना कारवाईचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. राणा यांच्यावर पोस्को अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी लोकांकडून आपल्याकडे आल्याचे खान यांनी नमूद केले. "हा देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र आहे. येथे दंगली घडवणाऱ्यांची किंवा अफवा पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, मग तो नेता कितीही मोठा का असेना." असे मत राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मांडले आहे.

मुस्लिम समाजाची भूमिका

या घटनेतील आरोपीचे समर्थन समाजाने केलेले नाही. उलट, मुस्लिम समाजाने संबंधित आरोपीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचेही प्यारे खान यांनी यावेळी स्पष्ट केले. राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी शहरात अशांतता पसरवू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT