नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात आगमन झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर ते दीक्षाभूमीत दाखल झाले. तेथे त्यांनी गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या ठिकाणी त्यांनी प्रार्थना देखील केली. संघभूमी आणि नंतर दीक्षाभूमीला भेट देऊन त्यांनी समतेचे दर्शन घडविल्याची भावना व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने दीक्षाभूमीला भेट दिली होती. त्यानंतर आता ते दुसऱ्यांदा दीक्षाभूमीवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान पदावर असताना त्यांनी दुसऱ्यांदा दीक्षाभूमीला भेट दिली आहे. पदावर असताना दोनदा दीक्षाभूमीला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदावर असताना दीक्षाभूमिला भेट दिली होती.
यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. तसेच दीक्षाभूमी स्मारक समितीचे सर्व सदस्य देखील आवर्जून उपस्थित होते. १९५६ मध्ये दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्या जागेवर आज जगाचे आकर्षण ठरेल अशी दीक्षाभूमीची सुरेख वास्तू उभी आहे.