मुधोजी राजे भोसले संतापले! File Photo
नागपूर

मुधोजी राजे भोसले संतापले! म्हणाले,...तर २४ तासात कोरटकरला होऊ शकते अटक!

'प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करावा'

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरच्या गुन्ह्यात प्रशांत कोरटकर यास इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अवमान प्रकरणी जामीन मिळाला असला तरी नागपूर तसेच जालना येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला अटक का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनात आणले तर 24 तासात कोरटकरला अटक होऊ शकते असेही त्‍यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसाच्या निमित्ताने प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करावा अशी मागणी भोसले यांनी केली. प्रशांत कोरटकर नंतर लगेचच शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला. सातत्याने महापुरुषांचा अपमान करण्याची ही परंपरा सुरू असून राज्य सरकारने अशा व्यक्तीं विरोधात राजद्रोह, देशद्रोह असा ठोस कायदा करून, गुन्हा दाखल करावा, अन्यथा अशा लोकांना राज्यात आम्ही फिरू देणार नाही असा इशारा राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या एका पत्रातून दिला होता.

आता कोल्हापूर पोलिसांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत, प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी हवा तसा तपास केला नाही. कोल्हापूरच्या गुन्ह्यात जामीन मिळाला असला तरी नागपूर आणि जालना येथे दाखल गुन्ह्यात अटक केली नाही असा आक्षेप घेत मुधोजी राजे भोसले यांनी एका पत्राद्वारे पोलिस अधीक्षक कोल्हापूर यांचे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने ठोस कारवाई केली जाईल असे एकीकडे सांगितले. दुसरीकडे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अतिशय निंदनीय शब्दात अपमान करणाऱ्या कोरटकरला अटकेपासून संरक्षण देणारा अंतरिम जामीन 11 मार्च पर्यंत दिला गेला. तो दिवस छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस, स्मृती दिवस खरेतर राज्यातील अठरापगड जनतेच्या, शिवभक्तांच्या भावना लक्षात घेता त्याचा जामीन रद्द व्हावा अशी अपेक्षा, मागणी आम्ही केली असताना त्याला 17 मार्चपर्यंत दिलासा दिला गेला. 17 मार्च तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची तर 18 मार्च शहाजी महाराज यांची जयंती आहे. याचाच अर्थ हा सर्व प्रकार केवळ योगायोग नसून सरकारने जनभावनेचा अंत बघू नये, जनभावना संतप्त असल्याने त्याचा स्फोट होऊ शकतो, असा इशारा नागरिक कृती समितीच्या वतीने राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT