CM फडणवीसांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी; PM मोदी म्हणाले, ‘मनाला भिडणारे पाऊल’ file photo
नागपूर

CM फडणवीसांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी; PM मोदी म्हणाले, ‘मनाला भिडणारे पाऊल’

दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात जाऊन शेतकरी बांधवांसोबत सणाचा आनंद साजरा केला.

पुढारी वृत्तसेवा

pm modi praises devendra fadnavis diwali with farmers in nagpur

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी केली. त्यांच्या या कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे आणि त्यांच्या घरी मुक्काम करणे हे मनाला भिडणारे पाऊल असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात जाऊन शेतकरी बांधवांसोबत सणाचा आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकरी कुटुंबातील अरुणाबाई बालपांडे आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामही केला. फडणवीस यांच्या या उपक्रमाचे पंतप्रधान मोदी यांनी विशेष कौतुक केले.

PM मोदींनी फडणवीसांच्या कृतीला म्हटले ‘मनाला भिडणारे पाऊल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'X' वरील पोस्ट पुन्हा शेअर करत त्यांचे कौतुक केले. मोदी यांनी लिहिले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले आणि अरुणाबाई व रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला. ही कृती खरोखरच मनाला भिडणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही या कृतीतून दिसून येते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हाच दिवाळीचा खरा अर्थ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हाच माझ्यासाठी दिवाळीचा खरा अर्थ आहे. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक हेमाडपंथी शिवमंदिराचा वारसा आणि कन्हान नदीच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी हे गाव ओळखले जाते.

शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून मुख्यमंत्री भावुक

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या कुटुंबीयांची चिंता आणि भविष्याबाबतच्या भीती जाणून घेतल्यानंतर मन भावुक झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी बालपांडे कुटुंबीयांनी ज्या आपुलकीने, प्रेमाने आणि उत्साहाने त्यांचे स्वागत केले, त्याने आपण भारावून गेल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, संपूर्ण देशात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्रातील शेतकरी मात्र सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान होत आहे. आर्थिक अडचणींसोबतच मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर कमी झाला तणाव

लोहारी सावंगा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव हळूहळू कमी होत असल्याचे दिसून आले, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना म्हटले, "साहेब, तुम्ही एवढ्या दूर आमच्या गावात आलात आणि आमच्या सुख-दुःखात सहभागी झालात, यामुळेच आमचे अर्धे दुःख कमी झाले." शेतकऱ्यांचे हे शब्द मनाला भिडल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी बस्तरमध्ये जवानांसोबत साजरी करण्याचे जाहीर केले आहे. देशाच्या रक्षणासाठी समर्पणाने कार्य करणाऱ्या वीर जवानांच्या बलिदान, त्याग आणि तपस्येला अभिवादन करण्यासाठी आपण त्यांच्यामध्ये जाणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT