नागपूर : पुढारी वृत्तसेवा
गेले अनेक दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून राजकारण तापले. आज मंगळवारी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मंजूर करीत राज्यपालांकडे देखील पाठविला. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नैतिकतेचा आव आणला जात असताना भाजप नेत्या, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र धनंजयने हा राजीनामा आधीच द्यायला हवा होता. त्यापेक्षाही त्यांचा राजीनामा आधी घेतला असता तर चांगले झाले असते किंबहुना शपथ दिलीच नसती तर ही वेळ आली नसती. गुन्हेगाराला कुठलीही जात नसते अशी रोखठोक प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मुंडे म्हणाल्या, त्या कुटुंबाच्या वेदनापेक्षा हे दुःख अधिक नाही. काल काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे ते व्हिडिओ उघडून पाहण्याची सुद्धा माझी हिम्मत झाली नाही. ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली आणि या घटनेचा व्हिडिओ केला आहे. त्या लोकांमध्ये एवढी निर्मनुष्यता आहे हे त्या व्हिडिओतून दिसते. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्यात मी माझी भूमिका मांडली होती. या हत्येमध्ये कोण सामील आहे. कोणाकोणाचा हात आहे हे फक्त तपास यंत्रणांना माहीत आहे. त्यामुळे मी यात हस्तक्षेप करण्याचा काही संबंध नाही. ज्या मुलांनी ही हत्या केली आहे, त्या मुलांमुळे संपूर्ण राज्यातील समाज ज्यांचा कुठलाही दोष नाही, त्यांची बदनामी झाली. संतोष देशमुख यांचा समाज सुद्दा आक्रोशात वावरत आहे.
आपल्या राज्यात कुठलीही गोष्ट जातीवर जाते. खरेतर अमानुषपणे एखाद्याला संपवणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या लोकांना कुठलीही जात नसते. मुळात गुन्हेगारांना जशी कुठली जात नसते तशीच राजकारण्यांना सुद्धा कुठली जात नसते हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी आमदारकीची शपथ घेतली, तेव्हाच कोणाबद्दल ममत्वभाव किंवा आकस बाळगणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे याही प्रकरणात कुठलाही जातीवाद होण्याचा प्रयत्न होऊ नये.
मी संतोष देशमुख यांच्या आईची आणि कुटुंबीयांची हात जोडून माफी मागते. या प्रकरणातल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे. यासंदर्भात मी यापूर्वीच सविस्तर बोलली आहे असे सांगत त्यांनी इतर काही उपप्रश्नांना उत्तर देणे टाळले.