Opration Sindoor : ऑपरेशन सिंदूरमधील शानदार नेतृत्वासाठी नागपूरच्या तुषार साखरे यांचा सन्मान! 
नागपूर

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमधील शानदार नेतृत्वासाठी नागपूरच्या तुषार साखरे यांचा सन्मान!

अमृतसर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत बजावली महत्त्वाची भूमिका; राष्ट्रपती पोलीस पदक आणि डीजी डिस्कनेही गौरव

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : ऑपरेशन सिंदूरदरम्यान अमृतसर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था सक्षमपणे सांभाळत, हाय अलर्टच्या काळात प्रभावी नेतृत्व करणारे नागपूरचे वरिष्ठ कमांडंट तुषार ज्ञानेश्वर साखरे यांना प्रतिष्ठित महानिदेशक (DG) / CISF डिस्क (सिल्व्हर) ने सन्मानित करण्यात आले आहे. साखरे सध्या सीआयएसएफ युनिट एएसजी, अमृतसर येथे वरिष्ठ कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या गौरवामुळे नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

वर्ष २०२५ मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर अमृतसर विमानतळावर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर होती. या काळात साखरे यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या तयारीचे बारकाईने निरीक्षण करत विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून तातडीने निर्णय घेणे, सुरक्षा पथकांचे योग्य नियोजन करणे आणि विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यात त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाबरोबरच परिचालन सज्जता, काटेकोर पर्यवेक्षण आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत त्यांना महानिदेशक डिस्क (सिल्व्हर) प्रदान करण्यात आली. हा सन्मान त्यांच्या व्यावसायिक कौशल्याची आणि उत्कृष्ट सेवाभावाची पावती मानला जात आहे.

तुषार साखरे हे मूळचे नागपूरच्या वैशाली नगर-बिनाकी लेआउट परिसरातील रहिवासी आहेत. सीआयएसएफमधील उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना यापूर्वीही राष्ट्रपती पोलीस पदक तसेच "डीजी डिस्क (कांस्य)"ने सन्मानित करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या संवेदनशील परिस्थितीत महत्त्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडून पुन्हा एकदा प्रतिष्ठित सन्मान मिळवल्याने साखरे यांच्या कुटुंबीयांसह नागपूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT