नागपूर : मकरसंक्रांत आटोपली तरी शहरात नायलॉन मांजाचा हैदोस अद्याप थांबलेला नाही. शुक्रवारी (दि.06) संध्याकाळी रमा नगर उड्डाण पुलावर पतंगीच्या धारदार नायलॉन मांजामुळे एका युवकाचा गळा खोलवर कापला गेला. या युवकासोबतच अन्य दोन जणही गंभीर जखमी झाले असून या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्नवर खान (४०) हे आपल्या दुचाकीने रामनगर उड्डाण पुलावरून जात असताना अचानक लोंबकळणारा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. काही समजण्याच्या आतच या धारदार मांजाने त्यांचा गळा चिरला. या जखमेमुळे त्यांच्या श्वासनलिकेला गंभीर इजा झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. याच उड्डाणपुलावर अशाच प्रकारे अन्य दोन व्यक्तीही मांजामुळे गंभीर जखमी झाल्या. हे तिघेही आपापल्या वाहनाने या उड्डाण पुलावरून जात होते.
तिन्ही जखमींना तातडीने कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जखमी मुन्नवर खान यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर अंजुम मोहसीन खान या महिलेच्या उजव्या डोळ्याच्या वर गंभीर जखम झाली असून तिरपुडे नावाच्या एका मुलाच्या उजव्या हाताची करंगळी कापल्या गेली आहे. त्या दोघांवरही उपचार सुरू आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष की नागरिकांचा बेजबाबदारपणा?
मकर संक्रांतीचा सण संपून अनेक दिवस झाले तरी, शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. पोलीस प्रशासन आणि नगर परिषद केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्यामुळेच आज एका निष्पाप युवकाचा जीव धोक्यात आला अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या.