नागपूर मध्यवर्ती बसस्थानक 
नागपूर

नागपूर मध्यवर्ती बसस्थानकावर सीसीटीव्हीच नाही!

Nagpur News : प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व बसस्थानकांवरील सुरक्षेचे वास्तव समोर येत आहे. यादरम्यान राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील मध्यवर्ती बस स्थानक गणेशपेठ येथे एकही सीसीटीव्ही नसल्याची बाब समोर आली आहे.

नागपुरातील गणेश पेठ येथील मुख्य बस स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. अनेक जिल्ह्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची येथे गर्दी असते. जवळच रेल्वे स्थानक आणि मध्य प्रदेश बस स्थानक तसेच खाजगी बस स्टॅन्ड असल्याने एकंदरीत हा परिसर सातत्याने गजबजलेला असतो. मात्र या बसस्थानकावर एकही सीसीटीव्ही नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

गणेशपेठ बस स्थानक आणि आगारामध्ये खाजगी एजन्सीचे नेमलेले १५ सुरक्षा रक्षक तीन शिफ्टमध्ये कार्यरत असतात. रात्रीच्या वेळी बसमधून उतरल्यानंतर ठिकठिकाणी लागलेल्या बसेसमधून वाट काढत असताना पुण्यासारखा हा प्रसंग नागपुरातही उद्भवू शकतो, अशी भीती काही प्रवाशांनी 'पुढारी' शी बोलताना व्यक्त केली. पंधरा सुरक्षारक्षकांपैकी पाच सुरक्षारक्षक एका पाळीत असतात यावरून सीसीटीव्ही शिवाय असलेली ही सुरक्षा यंत्रणा नागपूर सारख्या शहराला निश्चितच तोकडी म्हणता येईल. राज्य परिवहन महामंडळाकडे नागपूर बस स्थानकावर १३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता मात्र,अद्यापही कॅमेरे मिळालेले नाहीत. वेळोवेळी महामंडळाकडे याविषयीचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती गणेशपेठ आगार व्यवस्थापक अभय बोबडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT