Nagpur Municipal Corporation
नागपूर : नागपूर शहरातील संशयित बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष धाड पथके कार्यान्वित केली आहेत. नागरिकांना अधिकृत आणि सुरक्षित वैद्यकीय सेवा मिळावी तसेच अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाला आळा बसावा, या उद्देशाने झोननिहाय दवाखान्यांची तपासणी करण्यात येणार आहे. संशयित डॉक्टरांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यास त्याचीही तातडीने दखल घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर निता ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आलेल्या सूचनेनुसार बोगस डॉक्टरांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनपास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत झोनल वैद्यकीय अधिकारी, हिवताप निरीक्षक, औषध निर्माण अधिकारी, पोलीस निरीक्षक अथवा पोलीस पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संशयित बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी विशेष धाड पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (UPHC) वैद्यकीय अधिकारी या पथकात असणार आहेत. या पथकांकडून झोननिहाय संशयित डॉक्टरांच्या दवाखान्यांची तपासणी केली जाईल.
तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय परिषदेची नोंदणी तसेच इतर आवश्यक कागदपत्रे आहेत किंवा नाही, याची पडताळणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
शासनमान्य वैद्यकशास्त्रातील पदवी किंवा पदविका नसताना तसेच संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा बोगस किंवा अनधिकृत डॉक्टर म्हणून शोध घेतला जाणार आहे. याशिवाय शासनमान्य वैद्यकीय पद्धतीव्यतिरिक्त मान्यता नसलेल्या उपचारपद्धतींचा वैद्यकीय व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी संबंधित वैधानिक वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. अॅलोपॅथीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, होमिओपॅथीसाठी महाराष्ट्र समचिकित्सा परिषद, आयुर्वेद व युनानीसाठी महाराष्ट्र चिकित्सा परिषद तसेच दंतचिकित्सेसाठी महाराष्ट्र दंत वैद्य परिषदेकडे नोंदणी आवश्यक आहे.
सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील संशयित बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून अशा डॉक्टरांविरोधात तक्रार प्राप्त झाल्यास त्याची तातडीने दखल घेऊन आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नागरिकांनी संशयित बोगस डॉक्टरांविरोधात राज्यस्तरीय तक्रार निवारण कक्षाच्या १०४ या क्रमांकावर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या ८६६९४९४९४४ या चॅटबॉट क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात यासंदर्भातील माहिती प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार झोननिहाय संशयित बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करावी. नागरिकांनीही अशा व्यक्तींबाबतची माहिती संबंधित यंत्रणेला देऊन प्रशासनास सहकार्य करावे.- महापौर निता ठाकरे