Nagpur court verdict
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना 100 कोटींच्या खंडणीसाठी बॉम्बस्फोट धमकी प्रकरणी कुख्यात जयेश पुजारी आणि त्याच्या सहकाऱ्याला न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बेळगाव कारागृहातून त्याने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोनवर ही धमकी दिली होती. विविध कलमानुसार 5 वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी 35 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 10 महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश अनिलकुमार के. शर्मा यांनी सुनावली.
सरकारी अभियोक्ता वेदिका रा. पाटील ( विशेष सरकारी अभियोक्ता ) अॅड. एल. बी. शेंद्रे यांनी यात सहकार्य केले. एसीपी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, डॉ. अभिजित पाटील आणि सहकाऱ्यांनी तपास केला. आरोपींची नावे जयेश उर्फ जयेशकांत उर्फ शाहीर शकीर पुजारी, अफसर पाशा उर्फ बशीरुद्दीन उर्फ खुशिरुद्दीन मोहम्मद, मोहम्मद शकीर मोहम्मद हनीफ (फरार) अशी आहेत.
आरोपींनी हिंदलगा केंद्रीय कारागृह, बेळगाव येथून विविध मोबाईल क्रमांकांचा वापर करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या लँडलाईन क्रमांकावर धमकीचे कॉल केले. आरोपींनी 100 कोटी व 10 कोटी खंडणीची मागणी करून रक्कम न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणून जीवे मारण्याची धमकी दिली.
तपासादरम्यान आरोपी जयेश पुजारी याच्याकडून सीम कार्ड जप्त करण्यात आले.यासंदर्भात धंतोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या मैत्रिणीच्या ताब्यातून फोन नंबरची डायरी जप्त केली होती. मोबाईल पडताळणी पंचनाम्यात तालिबान जिंदाबाद, टीटीपी, अल्लाह अकबर अशा प्रकारचे संदेश आढळून आले. तपासात आरोपींचे टीटोपी तहरिक ए तालिबान, पाकिस्तान, डी गँग यांसारख्या बंदीस्त संघटनांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींनी कारागृहातून वेगवेगळ्या मोबाईल नंबरद्वारे धमक्या, खंडणी व आर्थिक व्यवहार केल्याचे तांत्रिक तपास, सीडीआर, संदेश, बँक व्यवहार, एकंदर 67 साक्षीदारांचे जबाब व इलेक्ट्रॉनिक पुराव्यांद्वारे सिद्ध झाले.