नागपूर : डेअरी क्षेत्राचा विकास झाल्यास विदर्भ शेतकरी आत्महत्या मुक्त होईल, असे प्रतिपादन ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘ऍग्रोव्हिजन’ चे शुक्रवारी (दि.22) पीडीकेव्ही ग्राउंड, दाभा येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षीय भाषणात नितीन गडकरी बोलत होते.
या कार्यक्रमाला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, माफसू नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे सीईओ विक्रम वाघ, क्रॉप केअर फेडरेशनचे अध्यक्ष दीपक शहा, कार्पोरेट रिलेशन्स अॅड अलायन्स टॅफे टॅक्टर्सचे समूह अध्यक्ष टी. आर. केसवन, अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर यांच्यासह आमदार समीर मेघे, सुधाकर कोहळे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, डॉ गिरीश गांधी, टेकचंद सावरकर, नागो गाणार यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी पुढे म्हणाले की, मदर डेअरीने 538 कोटींची गुंतवणूक नागपुरात करण्यासाठी एका मोठ्या मिल प्रोसेसिंग प्लांटची सुरुवात केली आहे. आज मदर डेअरी पाच लाख लिटर दूध शेतकऱ्यांकडून घेत आहे. ज्या दिवशी मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांकडून 50 लाख लिटर दूध गोळा केले जाईल आणि अन्य कंपन्या मिळून एकूण एक कोटी लिटर दूध गोळा करतील, तेव्हा निश्चितपणे विदर्भात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे गडकरी यावेळी म्हणाले.
यावेळी महिंद्रा ट्रॅक्टर्सचे सीईओ विक्रम वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागतपर भाषण आयोजन सचिव रवी बोरटकर यांनी केले. सुरुवातीला गायिका मंजिरी वैद्य अय्यर व त्यांच्या सहका-यांनी सरस्वती वंदना सादर केली. सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर डॉ. सी.डी मायी यांनी आभार मानले.