नागपूर: आम्ही कोणती कामे केली हे सांगण्याची यंदाच्या निवडणुकीत गरज नाही. प्रत्येक काम लोकांच्या पुढे आहे. आम्ही जे बोललो, ते करून दाखवले आणि जे काम केले, तेच बोलतो. या भागात अनधिकृत ले-आऊट मोठ्या प्रमाणात होते. पण आम्ही निवडून आल्यावर या ले-आऊट्सची जबाबदारी घेतली.
सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. आज 24 तास पाण्याची व्यवस्था आहे. उत्तम रस्ते झाले. उद्यानांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. १३५ सिटर बस रिंग रोडवर धावणार आहे. मी स्वतः स्कुटरवर फिरायचो तेव्हा रस्ते अत्यंत खराब होते. विकासाचे श्रेय जनतेलाच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मनपा निवडणूक प्रचार निमित्ताने दक्षिण, पूर्व,मध्य नागपुरातील जाहीर सभाना त्यांनी आज रविवारी रात्री मार्गदर्शन केले. महाल येथील सभेत गडकरी म्हणाले, ‘माझ्या जीवनाची सुरुवात या भागातून झाली. प्रत्येक भाग माझ्या परिचयाचा आहे. प्रत्येक गोष्टीशी माझा जवळून संबंध आहे. हा भाग खूप बदलला, याचा मला आनंद आहे. श्री कल्याणेश्वर मंदिरासाठी १६० कोटींची योजना तयार आहे. गजबजलेल्या परिसरातून १२०० कोटी रुपयांचा उड्डाणपूल तयार होत आहे. यावेळी आमदार मोहन मते, मुधोजी राजे भोसले आदीं तसेच सर्व महायुतीचे उमेदवारांची उपस्थिती होती.