नितेश कराळे  
नागपूर

Nitesh Karale | नितेश कराळे यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ची कारवाई , पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका, नागपूर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने नितेश कराळे यांना सहा वर्षांसाठी निष्कासीत केले. पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका पक्षाकडून कराळेंवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या पक्षांतर्गत कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झालेली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सचिव नितेश कराळे यांच्यावर पक्षाच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सहा वर्षांसाठी त्यांना निष्कासीत करण्यात आले आहे. पक्षाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या विरोधात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठींबा असल्याचा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

पक्षाची शिस्त, धोरणे, महाविकास आघाडीच्या निर्णयांचे उल्लंघन करणारी ही बाब आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठांच्या निर्देशानुसार सहा वर्षाकरिता पक्षातून निष्कासीत करण्यात आत येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभिजीत वंजारी निवडणूक लढत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठींबा असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

नितेश कराळे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नितेश कराळे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. महाविकास आघाडीच्यावतीने अभिजीत वंजारी उमेदवार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पक्षाच्या वतीने नितेश कराळे यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 

याबाबत नितेश कराळे यांच्याशी संपर्क साधला असता, मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. पक्षाकरिता सभा घेतल्या. स्वत:च्या क्लासकडे दुर्लक्ष करत पक्षाचे काम केले. कारवाई चुकीची आहे. तरीही कारवाईचा स्वीकार करतो. काँग्रेसकडून दबाव आणला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे नितेश कराळे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT