राजेंद्र उट्टलवार
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी प्रभाग २८ च्या नगरसेविका श्रीमती नीता ठाकरे आणि उपमहापौर पदासाठी प्रभाग २९ च्या नगरसेविका श्रीमती लीला हाथीबेड यांची नावे निश्चित करण्यात आली. भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ही अधिकृत घोषणा केली. या दोघींनीही आपले नामांकन अर्ज महापालिकेत जाऊन दाखल केले. यानिमित्ताने प्रथमच दोन्ही महत्वाची पदे दक्षिण नागपूरच्या पदरात पडली आहेत.
यापूर्वी संजय बालपांडे यांना उपमहापौरपद देण्याचे निश्चित झाले होते. मात्र त्यांनी सव्वा वर्षासाठी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याने लीला हाथीबेड यांना नशिबाने ही संधी मिळाली. आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन भाजपच्या 102 नगरसेवकांनी गट नोंदणी केली. यावेळी सत्ता पक्षनेते बाल्या बोरकर यांच्यासह प्रमुख नेते,पदाधिकारी, शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी उपस्थित होते.
आणि बालपांडे यांनी उपमहापौरपद नाकारले
ऍड.संजय बालपांडे यांचा उपमहापौर बनण्यास नकार आल्यानंतर पक्षापुढे पेच उभा राहिला. पुन्हा एकदा भाजपतील अंतर्गत वाद समोर आला. ठरल्याप्रमाणे स्थायी समितीसाठी ते आग्रही होते. न मिळाल्यास पाच वर्षे नगरसेवक म्हणूनही काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे विनंती केल्याची माहिती आहे. यानंतर सारिका नांदूरकर यांचे नाव चर्चेत आले. परंतु, महिला महापौर असल्याने पुरूष उपमहापौरासाठी प्रयत्न झाला.महेंद्र धनविजय, कल्पक भनारकर वा शेषराव गोतमारे यापैकी एकाला संधी देण्यावर खल झाला. मात्र शेवटी लीला हाथीबेड यांना ही संधी मिळाली. मनपात महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला.