नागपूर : पुढारी वृत्तसेवा
विदर्भ आता गतिमान दळणवळण, हवाई सेवेच्या दृष्टीने अग्रेसर होताना दिसत आहे. अमरावती विमानतळावरून मुंबई उड्डाण सुरू झाले. आता अकोल्यातही वेगवान घडामोडी सुरू असताना पूर्व विदर्भात गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होताच स्टार एअर कंपनीने बिरसी विमानतळावरून गोंदिया-इंदूर ही प्रवासी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात बिरसी विमानतळावर भेट देऊन आवश्यक सुविधांची पाहणी केली. एप्रिल अखेरपासूनच ही विमानसेवा प्रारंभ होणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वी फ्लाय बिग कंपनीने इंदूर-हैदराबाद विमान सेवा सुरू केली, मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती बंद झाली. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. माजी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या काळात या विमानतळाचा विस्तार झाला. इंडिगो कंपनीने गोंदिया-हैदराबाद तिरुपती प्रवासी विमान सेवा गेल्यावर्षी सुरु केली. गेल्या वर्षभरात या विमानतळावरून 40 हजारांवर प्रवाशांनी विमान प्रवास केला.
गोंदिया - गोंदिया पुणे व गोंदिया छत्रपती संभाजी नगर या मार्गावर सुद्धा विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र नाईट लँडिंग सुविधा नसल्याने ही प्रस्तावित विमान सेवा खोळंबली. आता लवकरच गोंदिया- इंदूर प्रवासी विमान सेवा सुरू करण्याचे कंत्राट स्टार एयर या विमान कंपनीने घेतले. तीन वरिष्ठ अधिकारी बिरसी विमानतळाची पाहणी करून गेले. गोंदिया विमानतळवरून ही सेवा सुरू होताच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रवाशांना इंदूरला जाणे शक्य होणार आहे. स्टार एअर कंपनीच्या इ 170 या ८८ आसनी विमानाने गोंदिया-इंदूर विमान सेवा सुरू होणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता गोंदियाला विमान पोहोचेल. साडेबारा वाजता गोंदियाहून इंदूरसाठी रवाना होईल अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक गिरीश चंद्र वर्मा यांनी दिली.