नागपूर - नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीस ठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे, तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांनी गुन्ह्याचा तपास, आरोपीची पार्श्वभूमी, मोबाईल व अन्य डिजिटल पुरावे, सायबर तपास आणि संभाव्य लागेबांधे याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
आरोपीने यापूर्वी नागपूरबाहेर अन्य जिल्ह्यांत किंवा राज्यांत अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, त्याला आणखी कोणाची मदत मिळाली आहे का, याचीही चौकशी करण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. आरोपीचा मोबाईल, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया व अन्य डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करावे. त्याच्या संपर्कातील संशयित व्यक्तींची सायबर तपासाच्या माध्यमातून पडताळणी करावी. तसेच परिसरातील नागरिकांकडूनही आवश्यक माहिती घेऊन तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाणे गाठल्याने आणि पोलिसांनीही प्रकरणाची तत्परतेने दखल घेतल्याने पुढील गंभीर अनर्थ टाळण्यास मदत झाली. दरम्यान ,तपास सुरू असताना पोलिसांचे मनोबल कमी होईल किंवा पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबावर अतिरिक्त दबाव निर्माण होईल, अशी विधाने अथवा कृती कोणीही करू नये, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
2 दिवस पोलीस कोठडी तपासासाठी अपुरी
या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी तपासाच्या व्यापकतेकडे लक्ष वेधले. “या प्रकरणाची व्याप्ती, आरोपीची पार्श्वभूमी, त्याचे अन्य जिल्हे किंवा राज्यांतील संभाव्य संबंध, मोबाईल व डिजिटल पुरावे, सायबर तपास तसेच त्याला मदत करणाऱ्या अन्य व्यक्तींचा शोध या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर तपासासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी अपुरा वाटतो,” असे नमूद केले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी “ऑनलाइन गेम खेळताना किंवा प्रायव्हेट चॅटिंग करताना समोरची व्यक्ती नेमकी कोण आहे, याची खात्री नसते. त्यामुळे मुला-मुलींनी आपली वैयक्तिक माहिती, मोबाईल क्रमांक, पत्ता, खासगी छायाचित्रे किंवा व्हिडिओ अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नयेत. कोणाकडून दबाव, धमकी किंवा ब्लॅकमेलिंग होत असल्यास घाबरून न जाता तातडीने पालक, विश्वासू व्यक्ती किंवा पोलिसांना माहिती द्यावी,” असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
यावेळी डॉ शिवसेनेच्या संपर्कप्रमुख वर्षा मोरे, जिल्हाप्रमुख ग्रामीण महिला आघाडी नेहा भोकरे शहरप्रमुख बंडू तळवेकर, नगरसेवक सूरज गोजे, नगरसेवक गणेश चारलेवार, जिल्हाप्रमुख महिला आघाडी मनीषा पापाळकर, अलका दलाल, निशांत चारडे, नितीन तिवारी, समीर शिंदे, सुषमा कांबळे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.