नागपूर : एकेकाळी घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवणारा भाजप पक्षच आज त्याच मार्गावर निघाला आहे. भाजपचे 'काँग्रेसिकरण' झाले आहे, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला.
मोठा जनाधार आणि '५१ टक्के मतांची खात्री' असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला आजही धमक्या का द्याव्या लागतात? या सुसंस्कृत पक्षाला नेमके झाले तरी काय? असे अनेक बोचरे सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केले.
खासदार सुळे यांनी यावेळी लोकशाहीच्या सद्यस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘आम्ही यशापयश सातत्याने बघितले आहे. मात्र आम्ही नेहमी सरळपणे निवडणूक लढलो आहोत. आज निवडणूक आयोगावर सर्वच घटकांकडून अविश्वास व्यक्त केला जात असेल, तर ते नक्कीच चुकीचे आहे. आमच्याकडे कुठलीही अदृश्य शक्ती किंवा अदृश्य यंत्रणा नव्हती.’
आज जे काही चालले आहे, ते सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे, अशी भीती खासदार सुळे यांनी व्यक्त केली. भाजपशी माझे राजकीय मतभेद आहेत, हे स्पष्ट करताना त्यांनी भाजपच्या जुन्या नेत्यांच्या परंपरेचा उल्लेख केला. ‘कधीकाळी अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली या नेत्यांसारखी चांगली परंपरा असताना, आज भाजपचे काँग्रेसिकरण झाले आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
ज्यांच्या विरोधात कधीकाळी रान पेटवले होते, त्यांच्याच सोबत भाजप आज 'काश्मीर ते कन्याकुमारी' सत्तेत सहभागी आहे, यावरही सुळे यांनी बोट ठेवले.
राज्यातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. दर तीन तासाला महाराष्ट्रात एक आत्महत्या होत आहे. सामाजिक, आर्थिक आणि शेतकऱ्यांची अवस्था गंभीर आहे. विकासाची स्वप्न दाखवली जात असली तरी आकडेवारी चिंताजनक आहे, असा त्यांनी खेद व्यक्त केला.
उमेदवारांची पळवापळवी होऊ नये, असे आवाहन करून त्या म्हणाल्या, ‘शेवटी लोकशाही टिकली पाहिजे. इंग्रजांविरोधात या देशात मोठा लढा उभारला. त्या उद्दिष्टांना ७५ वर्षात तडा जातोय की काय, असा प्रश्न आहे.’
यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, ‘काटोल विधानसभा निवडणूक लढणारे सलील देशमुख यांनी पक्षाचा राजीनामा दिला असला तरी ते लवकरच प्रचारात दिसतील. ‘आपल्या भागाचा विकास हे त्यांचे स्वप्न आहे. ते कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. गॉसिप करू नका, 'कुछ तो लोग कहेंगे...!' याची चिंता नाही,’ असे सांगत त्यांनी सध्या अनिल देशमुख प्रचारात असल्याचे नमूद केले. कोणत्याही कुटुंबाच्या व्यक्तिगत बाबतीत डोकावण्याचा आपल्याला अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.