Nagpur Political Updates
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांच्यासह राष्ट्रवादीचे १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडल्याचे माजी मंत्री रमेश बंग गटाला धक्का असल्याचे बोलले जात आहे. आमदार समीर मेघे यांची बाजू भक्कम झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्ज्वला बोढारे, १८ सरपंच, ९० ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांनी आज आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. भाजपसाठी हा आनंदाचा दिवस आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघात आणि नागपूर जिल्ह्यात भाजपचा होईल. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बंग यांना मिळालेली मोठ्या प्रमाणातील मते ही आता भाजपला मिळतील.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार राजू पारवे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान, आदर्श पटले, बिपीन गिरडे, विवेक इंदुरकर, विनायक खराबे, अश्विनी जिचकार, भास्कर खाडे, अमित कदम प्रामुख्याने उपस्थित होते.