NCP Rathayatra
नागपूर: नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या संकल्पनेतून १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त गौरव महाराष्ट्राचा महाकलश यात्रा काढण्यात आली असून ती सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे. नागपूर येथे आज रविवारी या यात्रेचे आगमन प्रसंगी स्वागत करण्यात आले.
टेकडी गणेश येथे दर्शन, आशीर्वाद आरती करण्यात आली. यानंतर ताजबाग येथे चादर चढविण्यात आली. नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत किमान 40 जागांची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र अद्यापही संघटनात्मक बांधणीत यश मिळू शकले नसल्याचे या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात आले. पक्षांतर्गत मतभेदही उघडपणे दिसले. शहराध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर. कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्यासह मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वाहनांची संख्या अधिक दिसली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ६५ व्या वर्षाचे औचित्य साधून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही "महाराष्ट्र गौरव रथयात्रा" आयोजित करण्यात आली आहे. संत ताजुद्दिन बाबा दरगाह येथे चादर चढवून येथील मृदा व पाणी घेत कलश पूजन करून रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले.