NCP Chintan Shibir Nagpur
राजेंद्र उट्टलवार
नागपूर: पक्षापेक्षा तुम्हाला इतर महत्त्वाचे काम असेल, तर ते खुशाल करा, पण आपली खुर्ची रिकामी करा, तुमच्या जागी इतरांना संधी देता येईल, अशी स्पष्ट ताकीद आज (दि.१९) राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विदर्भात विधानसभा निवडणुकीत 6 आमदार निवडून आल्यानंतर आता प्रथमच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटन मजबुतीवर भर दिला आहे.
जमल्यास एकत्रित नाहीतर स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेण्याचा पवित्रा यावेळी अनेकांनी बोलून दाखविला. एकंदरीत या चिंतन शिबिराच्या निमित्ताने भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीत राष्ट्रवादीच्या जागा वाटपासाठी दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला असेच म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही यानिमित्ताने केवळ दोन तासांसाठी जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांना कडक शब्दांत फटकारले.
पक्षाने तुम्हाला मोठे केले. आता तुम्हाला पक्षासाठी वेळ नसेल तर मंत्रिपद खाली करा, तुम्ही दोन तासांसाठी आले आणि गेले तर पक्षाला उपयोग होणार नाही. केवळ स्वातंत्र्यदिन, गणराज्यदीन किंवा महाराष्ट्र दिनाला तुम्ही झेंडावंदन करण्यासाठी जिल्ह्यात येणार असाल तर उपयोग नाही. तुम्ही आले नाही तरी चालेल. जिल्हाधिकारी झेंडावंदन करतील असेही पटेल यांनी ठणकावून सांगितले.
अर्थातच आता प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निशाण्यावर कोणकोण मंत्री आहेत ? त्याचीच चर्चा यानिमित्ताने शिबीर स्थळी होती हे विशेष. या शिबिरात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, खासदार सुनेत्रा पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे, आदिती तटकरे आदी अनेक नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी आदी उपस्थित होते.