OBC Federation Pudhari
नागपूर

OBC Federation: हा तर ओबीसी समाजाचा विश्वासघात; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा केंद्र सरकारवर घणाघात

जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसल्याने नागपुरात तीव्र संताप; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: "देशात सध्या जनगणनेचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाला आहे. मात्र, या जनगणनेच्या ३३ प्रश्नांमध्ये 'एससी' आणि 'एसटी' समाजासाठी स्वतंत्र कॉलम असताना, ओबीसींसाठीचा कॉलम जाणीवपूर्वक गाळण्यात आला आहे. जनगणनेत ओबीसींचा कॉलम असलाच पाहिजे, अन्यथा हा ओबीसी समाजासोबत झालेला मोठा विश्वासघात मानला जाईल," या शब्दांत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केंद्र सरकारला तीव्र इशारा दिला आहे. या संदर्भात महासंघाच्या वतीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या या धोरणाविषयी तीव्र खेद व्यक्त करण्यात आला.

२२ जानेवारी २०२६ रोजी जनगणना कार्यालयाने अधिकृत राजपत्र (Gazette) प्रकाशित करून जनगणनेची घोषणा केली, तेव्हा भाजपच्या लोकप्रतिनिधींसह आम्ही सर्वांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले होते. परंतु, या राजपत्रातील ३३ प्रश्नांपैकी १२ व्या प्रश्नात अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्याविषयीच्या माहितीची नोंद करण्याची तरतूद आहे, मात्र ओबीसी समाजाच्या कौटुंबिक माहितीची बाब पूर्णपणे गाळण्यात आली आहे. यामुळे ओबीसी हक्कासांठी लढणाऱ्या संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महासंघाचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप

ओबीसींचा कॉलम गाळला गेला तेव्हा सत्ताधारी भाजपच्या एकाही मोठ्या नेत्याने यावर मत व्यक्त केले नाही. निवडणुका आल्या की ओबीसींची मते हवी असतात, त्यासाठी समाजाला वेगवेगळ्या कर्मकांडामध्ये गुंतवून ठेवले जाते; पण हक्काची वेळ आली की नेते गप्प बसतात. ओबीसी समाजाला या देशात आपली अचूक लोकसंख्या किती टक्के आहे हे समजू नये का? मागील ५०-६० वर्षांपासून समाज १९३१ च्या जनगणनेचा '५२ टक्के' हाच आकडा घेऊन फिरत आहे. पक्षीय शिस्तीच्या नावाखाली लोकप्रतिनिधी बोलत नसले, तरी त्यांच्याही मनात ही मोठी खदखद आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मागील १० वर्षांपासून 'ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे' हीच पहिली आणि प्रमुख मागणी लावून धरली आहे.

"केंद्राच्या या कृतीमुळे ओबीसी समाजामध्ये सरकारच्या धोरणाविषयी प्रचंड संभ्रम आणि राग निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा नागपूर शहरात चौकाचौकात तीव्र आंदोलने केली जातील. तसेच संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर मोठे आंदोलन उभारण्यात येईल."
शरद वानखेडे (केंद्रीय सचिव) व परमेश्वर राऊत (शहराध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT