नागपूर : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेसचा एक गट आग्रही असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीच असहकाराची तक्रार दिल्ली दरबारी पोहोचली आहे. नागपुरातील गल्लीचा वाद आता एकप्रकारे दिल्लीत पोहचला आहे.
नाना पटोले हे संघ भाजपचे एजंट आहेत असा थेट आरोप करीत बंटी शेळके देशभर चर्चेत आले. पटोले आणि शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे समर्थकांनी बंटी शेळके यांच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्रपरिषदेत केली. लगेच दुसऱ्या दिवशी शेळके समर्थक कार्यकर्त्यांनी जे लोक आमच्यावर कारवाईची भाषा बोलतात त्यांनी मध्य नागपुरात काँग्रेसचे कामच केले नाही, असा आरोप केला. एकंदरीत या आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी आता दिल्ली दरबारी पोहोचल्या आहेत.
प्रदेश काँग्रेस व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अतुल कोटेचा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करतात मात्र, निवडणुकीत त्यांच्या बुथवर ते ५०% पेक्षा अधिक मतदान करू शकले नाही. काँग्रेसला जेमतेम मते मिळाली असा आरोप केला. शहर काँग्रेसच्या देवडीया काँग्रेस भवनला कुलूप पटोले यांच्याच आदेशावरून लावण्यात आले असाही आरोप झाला. तर दुसरीकडे कार्यालय साफसफाईसाठी काही दिवस बंद असल्याचा दावा करण्यात आला.
बंटी शेळके यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसात उत्तर देण्यास सांगितले मात्र, दोन दिवसानंतरही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई पक्षाने केलेली नाही. दुसरीकडे ते थेट दिल्ली दरबारी राहुल गांधी यांना भेटल्याची माहिती आहे. आपले नेते पटोले नाहीत राहुल गांधी आहेत असा पलटवार त्यांनी आपल्या विरोधकांवर केला. एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचे खापर फोडण्यासाठी आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेसमधीलच दुसरा गट लक्ष्य करीत असल्याचे उघड झाले आहे.