नागपूर : दिल्लीत सोमवारी झालेला स्फोट आणि निरपराध लोकांचा मृत्यू हे बिहारच्या निवडणुकीत गुंतलेल्या केंद्र सरकारचे फेल्युअर आहे या शब्दात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेचा निषेध केला.
मोदी सरकारने पहलगाम हल्ल्याचेही राजकारण केले. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने पाकिस्तान आपल्याकडे वाकडी नजर करून बघणार नाही अशी दर्पोक्ती केली. मात्र हा दावा किती फोल आहे हे या घटनेने दाखवून दिले आहे. केंद्राने या घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भाजप ज्या पद्धतीने 56 इंची सीना, या देशाचे संरक्षण केवळ आम्हीच करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करते मात्र काश्मीर आणि दिल्ली असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा दिसले आहे.
आम्हाला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही पण इतक्या आतपर्यंत दहशतवादी येत आहेत हे निश्चितच सरकारचे अपयश आहे. हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. पुलवामा, पहेलगाम आणि आता दिल्लीच्या घटनेने हे सिद्ध केले आहे. 26/ 11मुंबई हल्ला झाला त्यावेळी दहशतवाद्यांना जागीच कंठस्नान घालण्यात आले याकडे लक्ष वेधले.
निवडणूक लढणे आणि जिंकणे याच विचारात नेहमी सरकार असते. कधीही देशाचा विचार केला जात नाही. बिहारमध्ये गृहमंत्री कुठल्याही सीसीटीव्ही कॅमेराशिवाय विना सुरक्षेत कशासाठी होते याविषयीचा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.